लेखांक चौदावा : “लगे रहो मुन्नाभाई”

लेखांक चौदावा 

“लगे रहो मुन्नाभाई” सारखी 'गांधीगिरी' करायची वेळ आली आहे. अन्न वाया घालवणे, पाणी समस्या भीषण असताना त्याचा अपव्यय करणे. दूरदर्शनच्या जाहिराती आपण पाहतो पण चॅनेल बदलले की विसरतो. आपल्याला धन कमवायचे आहे तर ते वाचवायला शिकले पाहिजे. शासनाच्या अनेक जाहिराती प्रबोधनपर आहेत. वीजेचं बील किती येतं ? एसीमध्ये बसून गार हवा जितकी सुखावते तितकी बिलाची रक्कम पाहून त्या एसीतच घाम फुटतो. मग विचार करतो ? अरेच्च्या एवढे बील कसे काय ??? 

एका जाहिरातीत एका कुटुंबप्रमुखाच्या हातात वीज बील आल्यावर डोळयापुढे काजवे येतात. मनात असंख्य प्रश्न घेऊन तो त्या प्रशस्त घरात फिरतो. गरज नसताना ठिकठिकाणी वीज वाया जात असते. टीव्ही चालू ठेवून मुलगी बेडवर पडून फोनवर गप्पा मारत अखते. फ्रीजचं दार उघडं परंतु बायकोचं लक्ष नाही. भर दिवसा घरातले फॅन, लाईटस् चालूच असतात... त्यानंतर तो करंट लागावा तसा शोधमोहिम सुरु करुन 'स्वीच ऑफ' करत सुटतो. मग कुटुंब सदस्यही आठवणीने तो कित्ता गिरवतात आणि बीलात सुधारणा होते. कुटुंबाच्या मिळकतीचा फार मोठा हिस्सा त्यामुळे वाचतो. असे अनेक मार्ग आहेत ज्यामुळे अनाठायी खर्चाला कात्री लावून आपला धनसंचय वाढू शकतो. इतरांच्या चुका आपल्यालाही सुधारायला मदत करतात. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' हेच खरे. 



आठवणी निघतात तेव्हा एकातून एक पदर उलगडत नेतात. २४ तास भरमसाठ चॅनेलचे ते दिवस नव्हते. लोक नातं सांभाळून एकमेकांकडे सहकुटुंब सहपरिवार संध्याकाळी गप्पाटप्पा मारण्यासाठी जात असत. अचानक टीव्ही, फोन, मोबाईलची मुबलकता आली आणि वॉटस्अप/फेसबुक सारख्या सोशल माध्यमांनी धुमाकूळ घातला. 'उडदामाजि काळे गोरे' ज्ञानोबा म्हणूनच गेलेत. चांगल्यापेक्षा वाईट बाजू स्विकारली गेली. All that glitters is not gold अर्थात चकाकते ते सारे सोने नसते पण आजच्या काळात वरवरच्या देखाव्याला महत्व प्राप्त झाले . 'काय भुललासि वरलिया रंगा' हे फक्त चोखोबांच्या अभंगातच राहिले. 

ईर्षा, स्पर्धा, रॅटरेस फक्त पुढे जायचे आहे सगळयांना ! मागे कोणालाच रहायचे नाही. कुठेतरी सहज वाचनात आलं होतं आणि मी खळखळून हसलो. 'हल्ली लहानपणीच मुलांना फार मोठं व्हायचं असतं'. माझी आजी नेहमी म्हणायची, कलीचा प्रभाव वाढतोय मला तेव्हा कळायचं नाही. मग लक्षात यायला लागलं. कलिच्या प्रभावाचं सर्वात बाधित क्षेत्र म्हणजे पैसा ! 



'आटपाट एक नगर होतं... .' या वाक्यानं श्रावणात सुरु होणाऱ्या कहाण्या महानगरीत वेगळे संदर्भ घेऊन दररोज घडू लागल्या. भूगोलात नकाशावर आपल्या देशाची दारिद्रयरेषा कुठून कुठे गेलीय याचा शोध तेव्हापासून सुरु आहे. 

क्रमश: